युद्ध सामग्रीची वाहतूक करणे, सैन्य घेऊन जाणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत रामा राणेंनी रस्ता निर्धोक, वाहतुकीसाठी खुला करण्याचे जोखमीचे काम केले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ही कामगिरी पार पाडली. ८ एप्रिल १९४८ रोजी राणे यांना नौशेरा - राजौरी भागातल्या रस्त्यावरचे अडथळे व सुरुंग काढून टाकण्याचे काम सांगितले गेले. शत्रुसैन्याकडून तुफान गोळीबार होत असताना राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना हे काम करावे लागले. झालेल्या तुफान गोळीबारात त्यांच्या पथकातील दोन माणसे मरण पावली आणि राणेंसहित चारजण जखमी झाले. त्याही अवस्थेत राणे यांनी आपल्या तुकड्यांची पुनर्रचना केली. रणगाडे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते करण्याचे काम सुरू केले. शत्रूकडून होणार्या प्रचंड गोळीबाराचा सामना करत त्यांनी हे काम केले. ८एप्रिल१९४८ रोजी दुपारी सुरू झालेले हे काम सलग चोवीस तास चालले होते.
९ एप्रिलला दुपारी त्या तयार झालेल्या रस्त्यावरून सैन्य आणि रणगाडे जाऊ लागले. त्या रस्त्यावर पुढे पाइनचे अनेक वृक्ष अडथळा म्हणून टाकले होते. टप्प्याटप्प्याने ते वृक्षही बाजूला सारत त्यांनी रस्ता मोकळा केला. दुर्गम डोंगराळ प्रदेशातले निमुळते रस्ते खुले करण्यासाठी त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत नेतृत्व केले. काही ठिकाणी पूलदेखील उद्ध्वस्त झालेले होते. राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते पूल बांधले, सुरुंग दूर केले. स्वत: जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी उत्तम नेतृत्व, धैर्य, संयम, आत्मविश्वास, अपार देशप्रेम या गुणांच्या जोरावर अथक प्रयत्नांतून दि.११ एप्रिलच्या रात्री उशिरा, दहा वाजेपर्यंत त्यांनी हे रस्ते सुरक्षित व वाहतुकीसाठी सुयोग्य करण्याचे काम केले. त्यामुळे भारतीय रणगाडे सुरळीतपणे चिंगस येथे पोहोचू शकले.
या कार्यासाठी ‘परमवीरचक्र’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. राणे २५ जून १९५८ रोजी मेजर म्हणून निवृत्त झाले. त्यानंतरही म्हणजे दि.७ एप्रिल १९७१ पर्यंत त्यांनी भारतीय सेनेत पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून काम पाहिले. राणे यांचा मृत्यू पुण्याच्या सैनिकी इस्पितळात अल्पशा आजाराने झाला. पुण्यातील संगमवाडी भागात त्यांच्या नावाने एक शाळा उभारण्यात आली आहे.